फरसखाना पोलिसांची मोठी कामगिरी; घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरांना जेरबंद, तब्बल ₹18.44 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे : फरसखाना पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी छडा लावत दोन सराईत आरोपींना अटक करून तब्बल ₹18 लाख 44 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दिनांक 6 मार्च 2026 रोजी कसबा पेठ येथील एका फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी सुरक्षा दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

यावेळी घरातील सुमारे 130.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख ₹50 हजार रुपये असा एकूण ₹11 लाख 7 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. याप्रकरणी फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पोलीस हवालदार गजानन सोनुने यांनी संशयित आरोपींची ओळख पटवली. आरोपी पोलिसांना चकवा देत दिल्ली, अयोध्या, आग्रा, झाशी, लातूर, वाशी आणि छत्रपती संभाजीनगर परिसरात वारंवार ठिकाणे बदलून राहत होते.

अखेर छत्रपती संभाजीनगर येथून त्यांना ताब्यात घेण्यात आले.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चंद्रकांत ऊर्फ चंद्या अनंत माने (वय 33, रा. चिंचवड, पुणे) आणि रामा ऊर्फ रामजाने लक्ष्मण भिसरागर (वय 33, रा. कळंब, धाराशिव) अशी आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीतील सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल तसेच दरवाजा तोडण्यासाठी वापरलेला अॅडजस्टेबल टेबल पाना असा एकूण ₹18.44 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भसे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शिवप्रकाश मुळे, पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे तसेच पोलीस हवालदार गजानन सोनुने आणि तपास पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *