काळेपडळ पोलिसांची धडक कारवाई; हातभट्टी दारू विक्री करणारा इसम जेरबंद, ५.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

पुणे : काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या इसमावर कारवाई करत तब्बल ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दि. २४ मे २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार नितीन बोले व गिरीराज जगवळे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत माहिती मिळाली.

सातवनगर, हांडेवाडी रोड, पुणे येथील गणपती मंदिरामागील मोकळ्या जागेत एक इसम चारचाकी वाहनामध्ये गावठी हातभट्टी दारूचा साठा करून त्याची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना माहिती दिली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकून सुनील हरी कचरावत (वय ५०, रा. गणपती मंदिराजवळ, सातवनगर, हांडेवाडी रोड, पुणे) यास ताब्यात घेतले.

तपासादरम्यान त्याच्या ताब्यातील चारचाकी वाहन (क्र. एमएच-१२/डीएम-४०८०) तसेच परिसरातील झाडाझुडपांत लपवून ठेवलेली एकूण २४५० लिटर हातभट्टी दारू व ७० प्लास्टिक ड्रम असा एकूण ५ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई), (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस उपआयुक्त परिमंडळ-६ पुणे शहर जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अतुल नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहीद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, अतुल पंधरकर, नितीन बोले, सदाम तांबोळी, प्रदीप बेडीसकर, महादेव शिंदे व गिरीराज जगवळे यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *