पुणे पोलिसांकडून “SAIYAM” अहवाल प्रसिद्ध; युवकांमधील व्यसनाधीनतेच्या धोक्याचे गंभीर चित्र समोर

 

पुणे :पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने युवकांमधील वाढत्या व्यसनाधीनतेच्या समस्येवर आधारित “SAIYAM: The Status of Vulnerability to Addiction” हा महत्त्वपूर्ण अहवाल अधिकृतपणे प्रकाशित करण्यात आला आहे. हा अहवाल ताराचंद रामनाथ सेवा ट्रस्ट आणि ज्ञान प्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधन विभागाच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आला आहे.

या अहवालाचे प्रकाशन पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी, संशोधक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

2024-25 या शैक्षणिक वर्षात करण्यात आलेल्या या अभ्यासात 13 ते 22 वयोगटातील 1887 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तसेच पालक, शिक्षक, समुपदेशक, डॉक्टर आणि सामाजिक तज्ज्ञ अशा 77 जणांच्या अनुभवांचाही समावेश करण्यात आला आहे.

या संशोधनात मद्यपान, तंबाखू, ड्रग्स, एनर्जी ड्रिंक्स आणि डिजिटल व्यसन या पाच प्रमुख व्यसनांचा सखोल अभ्यास करण्यात आला.

📊 अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष :

• प्रत्येक 6 पैकी 1 विद्यार्थ्याने किमान एकदा मद्यपान केले आहे
• 92% विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम माहित असूनही सुमारे 40% विद्यार्थ्यांनी तंबाखूचा वापर केल्याचे सांगितले
• सुमारे 20% विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरात ड्रग्स सहज उपलब्ध असल्याचे नमूद केले
• सुमारे एक तृतीयांश विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल व्यसनाची लक्षणे आढळली
• 20-22 वयोगटातील जवळपास 60% युवक दररोज 3 ते 6 तास स्क्रीन टाइम वापरतात या पार्श्वभूमीवर शासन आणि समाजाने एकत्रितपणे तातडीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

शाळांच्या परिसरात कायद्याची कडक अंमलबजावणी, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर लक्ष, तसेच डिजिटल व्यसनाला सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न म्हणून ओळख देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, युवकांना व्यसनापासून वाचवण्यासाठी शाळा, कुटुंब, समाज आणि विविध संस्थांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि जनजागृती ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच या अहवालाच्या माध्यमातून पुण्यात व्यसन प्रतिबंधासाठी अधिक प्रभावी धोरणे राबविण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही सांगण्यात आले. पुढील काळात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा आणि विशेष उपक्रम राबवले जाणार आहेत.

हा अहवाल युवकांमधील व्यसनाच्या समस्येची तीव्रता समजून घेण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना आखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *