अवैध कारवायांविरोधात कडक भूमिकेची घोषणा; नागरिकांचा सवाल – कारवाईची गती आणि परिणाम कितपत दिसणार?
माळेगाव (बारामती तालुका प्रतिनिधी): माळेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्डे, पत्त्यांचे क्लब, गुटखा विक्री तसेच इतर बेकायदेशीर कारवायांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मात्र, परिसरातील काही नागरिकांकडून अवैध धंद्यांबाबत सातत्याने तक्रारी होत असल्याने या कारवायांवर प्रत्यक्ष आणि कायमस्वरूपी आळा कधी बसणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबल्याचे सांगितले असले, तरी या मोहिमेचे परिणाम आगामी काळात कितपत प्रभावी दिसून येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलीस प्रशासनाने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून, अवैध धंद्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे आढळल्यास संबंधितांवर विभागीय चौकशीसह नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
नागरिकांच्या मते, अवैध धंद्यांविरोधातील मोहीम केवळ घोषणांपुरती न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. विशेषतः तरुण पिढीवर होणारे दुष्परिणाम, सामाजिक वातावरणावर पडणारा परिणाम आणि वाढणारी गुन्हेगारी यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
यापुढे अवैध दारू विक्री, मटका, जुगार अड्डे किंवा प्रतिबंधित गुटखा विक्री आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी गस्त, विशेष पथके आणि गुप्त माहिती संकलनावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, नागरिकांचा मुख्य प्रश्न मात्र कायम आहे — “अवैध धंद्यांविरोधातील ही मोहीम प्रत्यक्षात किती प्रभावी ठरणार आणि माळेगाव अवैध व्यवसायमुक्त कधी होणार?” नागरिक आता घोषणांपेक्षा ठोस आणि दृश्यमान कारवाईची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
