पत्नीनेच रचला पतीच्या हत्येचा कट? सुपारी देऊन चारचाकीने धडक; कराडमधील धक्कादायक प्रकार उघड

 

कराड | प्रतिनिधी कराड शहरात एका सरकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूमागे अपघात नसून नियोजित हत्येचा कट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जलसंपदा विभागातील उपविभागीय अधिकारी लक्ष्मण शिरंग मंडले (वय 54, रा. मनवे, ता. कराड) यांच्या मृत्यूप्रकरणी त्यांच्या पत्नीसह अन्य आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण मंडले हे यापूर्वी कराड परिसरात पाणीपुरवठा विभागात अभियंता म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली ठाणे येथे जलसंपदा विभागात अधिकारी म्हणून झाली होती. 6 जून रोजी पहाटे सुमारे 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान ते ठाण्यावरून कराड येथे आले होते.

यावेळी यशवंत हॉलसमोर त्यांच्या पाठीमागून भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. सुरुवातीला हा अपघात असल्याचे भासविण्यात आले. मात्र, घटनास्थळासमोरील शिंदे हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला असल्याचे तपासात समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, धडक दिल्यानंतर काही संशयित व्यक्ती वाहनातून खाली उतरल्या आणि मृताच्या जवळील बॅग घेऊन गेल्याचेही सीसीटीव्हीत दिसून आले. त्यानंतर पुन्हा घटनास्थळी येऊन पाहणी केल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला.

या प्रकरणाचा तपास करताना कराड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दरोडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही फुटेज व अन्य पुराव्यांच्या आधारे चौकशी केली. त्यानंतर हा अपघात नसून नियोजित हत्या असल्याचा संशय दृढ झाला.

तपासादरम्यान मृताची पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (वय 36) आणि तिचा भाऊ संग्राम दिनकर चव्हाण (वय 40, रा. सुरूर पेठ, ता. वाळवा) यांनी दोन जणांना सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप समोर आल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हा कट सुमारे एक महिन्यापूर्वी रचण्यात आल्याचा संशय असून, प्रत्यक्ष धडक देणाऱ्या आणि सुपारी स्वीकारलेल्या दोन संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास कराड पोलीस करीत असून, तपास पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण कटाचे नेमके कारण आणि इतर बाबी स्पष्ट होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *