पुणे जिल्हातील भोंदू बाबांचे साम्राज्य उद्ध्वस्त होणार का ? सोशल मीडियावर गांजा ओढतानाचे व्हिडिओ व्हायरल करणारे तथाकथित साधू गांजा समर्थक आहेत का?

 

“अंधश्रद्धेच्या आडून लूटमार, महिलांचे शोषण आणि अमली पदार्थांचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; कायद्याचे राज्य सर्वांसाठी समान असावे.”

पुणे -: अंधश्रद्धेच्या नावाखाली लूट, अत्याचार आणि अमली पदार्थांच्या जाळ्याविरोधात कठोर कारवाईची मागणी; भोंदूगिरी, अघोरी प्रथा आणि व्यसन संस्कृतीला संरक्षण मिळते आहे का?

महाराष्ट्रात तसेच पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांमध्ये स्वतःला चमत्कारी, तांत्रिक, सिद्धपुरुष अथवा आध्यात्मिक गुरु म्हणून सादर करणाऱ्या काही कथित भोंदू बाबांविरोधातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे.

अंधश्रद्धा, जादूटोणा, चमत्कार, ग्रहदोष निवारण, करणी उतरविणे, आर्थिक संकट दूर करणे, प्रेमसंबंध जुळवून देणे, व्यवसायात यश मिळवून देणे अशा विविध आमिषांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या तसेच महिलांवर लैंगिक शोषण व अत्याचार झाल्याच्या अनेक तक्रारी विविध तपास यंत्रणांकडे दाखल होत असल्याची चर्चा आहे.

अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्रात लागू असलेल्या महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

तपास यंत्रणांच्या कारवाईमुळे अनेक कथित बाबांचे बिंग फुटत असताना, अजूनही काही जण मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबर, उद्योगपतींबरोबर अथवा प्रभावशाली व्यक्तींशी छायाचित्रे काढून स्वतःचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आरोप होत आहेत.

कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, त्यामुळे अशा व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची, आश्रमांची, देणग्यांची, मालमत्तेची आणि नागरिकांकडून घेतलेल्या पैशांची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

विशेषतः स्मशानभूमी, अघोरी पूजा, प्रेतपूजा, काळी जादू, करणी काढणे, भूतबाधा दूर करणे यांसारख्या दाव्यांच्या माध्यमातून भीती निर्माण करून लाखो रुपयांची उकळपट्टी केली जात असल्यास संबंधितांविरोधात फसवणूक, गुन्हेगारी विश्वासघात, महिलांवरील अत्याचार, अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून कठोर शिक्षा देणे आवश्यक असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

याचबरोबर काही तथाकथित साधू-संतांकडून सार्वजनिक ठिकाणी गांजा, चरस, अफू अथवा इतर अमली पदार्थांचे सेवन केल्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रेसमाजमाध्यमांवर व्हायरल होत असतात.

धार्मिक व आध्यात्मिकतेचा संदेश देणाऱ्या व्यक्तींनी अशा पदार्थांचे सार्वजनिक प्रदर्शन करणे योग्य आहे का? सोशल मीडियावर गांजा ओढतानाचे व्हिडिओ प्रसारित करणारे हे साधू अप्रत्यक्षपणे गांजा संस्कृतीचे समर्थन करीत आहेत का? असा प्रश्नही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

भारतामध्ये अमली पदार्थांवर नियंत्रणासाठी एनडीपीएस कायदा लागू असून कोणत्याही व्यक्तीस कायद्याचे उल्लंघन करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्या तसेच अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेऊन मूळ पुरवठादारांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

पोलीस, अंमली पदार्थ विरोधी पथके, महिला सुरक्षा विभाग, आर्थिक गुन्हे शाखा आणि संबंधित तपास यंत्रणांनी संयुक्तपणे कारवाई करून अंधश्रद्धा, आर्थिक फसवणूक, महिलांवरील अत्याचार आणि अमली पदार्थांचे जाळे उघड करावे, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

नागरिकांनीही कोणत्याही चमत्काराच्या दाव्यांना बळी न पडता, संशयास्पद प्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना व संबंधित प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *