नदीत उडी, उसाच्या फडात लपण्याचा प्रयत्न; दीड तासांच्या थरारक शोधमोहीमेनंतर अटक, न्यायालयाने येरवडा कारागृहात रवानगी केली.
बारामती : तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन-बेलेबल वॉरंट जारी केलेला सराईत फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके (रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे) याला बारामती शहर पोलिसांनी धाडसी आणि नियोजनबद्ध कारवाई करत अटक केली. अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला चकवा देणारा हा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीसांना २४ मे २०२६ रोजी सकाळी गोपनीय माहिती मिळाली की, शंकर उर्फ पोक्या आडके हा दशविधी कार्यक्रमासाठी आपल्या मूळ गावी आला आहे. माहिती मिळताच पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे आणि पोलीस शिपाई वैभव मदने यांनी तातडीने पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने अटकेपासून बचाव करण्यासाठी थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीत उडी घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नदीकाठावरील दाट उसाच्या फडात लपून बसला. उंच उसाचे पीक आणि अवघड परिसरामुळे आरोपीचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने परिसरात कसून शोधमोहीम राबवली.
जवळपास दीड तास सुरू असलेल्या या थरारक शोध मोहीमेदरम्यान उसामध्ये संशयास्पद हालचाल दिसून आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालत आरोपीला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. अनेक वर्षांपासून न्यायालय आणि पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर कायद्याच्या कचाट्यात सापडला.
सदर आरोपीविरुद्ध बारामती शहर, बारामती तालुका आणि वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्याच्याविरोधात न्यायालयाने १५ नॉन-बेलेबल वॉरंट जारी केले होते. न्यायालयाने वारंवार समन्स, नोटिसा आणि वॉरंट बजावूनही तो सुनावणीस हजर राहत नव्हता.
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला येरवडा कारागृह, पुणे येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
या कारवाईत न्यायालयीन कागदपत्रे, वॉरंट अंमलबजावणी आणि आरोपीचा पाठपुरावा करण्यासाठी महिला पोलीस हवालदार सगुना आवटे व पोलीस हवालदार उमा कोकरे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या यशस्वी कारवाईनंतर बारामती शहर पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, न्यायालयाने वॉरंट जारी केलेले तसेच गुन्ह्यांमधून फरार असलेल्या आरोपींविरुद्ध भविष्यातही अशाच प्रभावी आणि कायदेशीर कारवाया सुरू राहतील.
