मांजरी (पुणे) येथे दोन इसम शस्त्रांसह जेरबंद; विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांची मोठी कारवाई 

 

पुणे : मांजरी, पुणे येथे पोलिसांनी विशेष शस्त्रविरोधी मोहिमेदरम्यान दोन इसमांना धारदार शस्त्रांसह जेरबंद केले आहे. दिनांक 18/04/2026 ते 24/04/2026 या कालावधीत पुणे शहर पोलिसांकडून अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मांजरी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.

पोलिस उपनिरीक्षक गौरव देव व त्यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, प्रणवराज यादव आणि त्याचा साथीदार जय शेलार हे दोघेही धारदार शस्त्रांसह मांजरी ग्रीन अ‍ॅनेक्स बिल्डिंग (फ्लॅट नं. 405) येथे थांबले आहेत. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली.

दिनांक 19/04/2026 रोजी सुमारे दुपारी 2:05 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.

यावेळी प्रणवराज सुनिल यादव (वय 25, रा. मांजरी ग्रीन अ‍ॅनेक्स, पुणे) याच्याकडून अंदाजे ₹3000 किमतीच्या दोन लोखंडी तलवारी व दोन लोखंडी सुरे जप्त करण्यात आले.

जय गणेश शेलार (वय 25, रा. पवार रेसिडेन्सी बॉईज हॉस्टेल, हडपसर, पुणे) याच्याकडून अंदाजे ₹500 किमतीचा एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आला.

सदर कारवाई दरम्यान संबंधित इसमांनी शासनाने लागू केलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले. दिनांक 14/04/2026 पासून 27/04/2026 पर्यंत लागू असलेल्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगण्यास मनाई असताना त्यांनी हा आदेश मोडला.
याप्रकरणी मांजरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 22/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 4(25), BNS कलम 3(5) तसेच महाराष्ट्र पोलीस अ‍ॅक्ट कलम 37(1)(क) सह 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस निरीक्षक राम राजमाने, उपनिरीक्षक गौरव देव तसेच त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *