वाघोली : वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून एमडी (मेफेड्रोन) ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल 31 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. वाघोली परिसरातील सातवस्ती रोडवरील संशयित हालचालीवर लक्ष ठेवून पोलिसांनी सापळा रचला.
या कारवाईदरम्यान योगेश सुभाष कणगरे (वय 38, रा. लोहगाव, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत सुमारे 1 लाख 8 हजार रुपयांचे एमडी पावडर (मेफेड्रोन) व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले.
तपासादरम्यान त्याने हा अमली पदार्थ त्याचा साथीदार सोनू सिंह उर्फ मनवेंद्र शंकर सिंह (वय 42, रा. टिंगरेनगर, पुणे) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला देखील अटक केली.
दुसऱ्या आरोपीकडून 1 लाख 74 हजार रुपयांचे एमडी ड्रग्स, दुचाकी वाहन आणि मोबाईल जप्त करण्यात आला. तसेच पुढील तपासात आरोपीच्या ताब्यातील कारमधून आणखी 4 लाख 64 हजार रुपयांचे एमडी ड्रग्स आणि 20 लाख रुपयांची कार जप्त करण्यात आली.
एकूण 37 ग्रॅमपेक्षा अधिक मेफेड्रोन (एमडी), दोन कार, एक दुचाकी, मोबाईल असा एकूण 31,06,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करत आहेत.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
