पुणे -: हडपसर पोलिस ठाणे गु.र.नं. 753/2018 अन्वये भा.दं.वि. कलम 307, 323, 504, 506, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 4(25) अंतर्गत दाखल असलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणातील आरोपी अमोल बाळासाहेब बोरकर (वय 33, रा. काळे कॉम्प्लेक्स बिल्डिंग, काळेपडळ, पुणे) व सागर विजय काळे (वय 33) यांनी संशयाच्या कारणावरून प्रतीक सकपाळ याला जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक श्री. दिलीप गाडे (सध्या नियुक्ती – लातूर ग्रामीण) यांनी केला होता. त्यांनी आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सेशन केस क्रमांक 653/2018 अशी नोंद करण्यात आली होती. हा खटला शिवाजीनगर, पुणे येथील जिल्हा व सत्र न्यायालयात चालला.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. नामदेव तरळगट्टी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट कामकाज पाहणारे हडपसर पोलिस ठाण्यातील पोलिस अंमलदार संभाजी म्हांगरे यांनी सर्व भौतिक व दस्तऐवजी पुरावे योग्य नियोजनबद्ध पद्धतीने न्यायालयात सादर केले. तसेच साक्षीदार व फिर्यादी यांची वेळोवेळी उपस्थिती सुनिश्चित करण्यात आली.
यामुळे मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी दिनांक 7 मे 2026 रोजी आरोपींना दोषी ठरवत भा.दं.वि. कलम 307 अंतर्गत 10 वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त 1 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
तसेच भा.दं.वि. कलम 323 अंतर्गत 3 महिन्यांचा साधा कारावास व 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसांचा अतिरिक्त कारावास अशीही शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ-6 डॉ. सागर कवडे, सहायक पोलिस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या हडपसर पोलिस ठाण्याच्या पथकाचे कौतुक करण्यात आले आहे.
