OLX वर टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने Royal Enfield चोरी; विमानतळ पोलिसांची कारवाई

 

पुणे : विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या हद्दीत OLX वर विक्रीसाठी टाकलेल्या दुचाकीची टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने वाहन चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

दि. 14 मार्च 2026 रोजी फिर्यादी यांनी विमानतळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती. फिर्यादी यांनी त्यांची Royal Enfield कंपनीची Meteor 350 ही दुचाकी OLX वर विक्रीसाठी पोस्ट केली होती.

त्यानंतर दि. 10 मार्च 2026 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास “इशिता माथुर” नावाच्या व्यक्तीने गाडी खरेदीत रस असल्याचे सांगून संपर्क साधला. त्यानंतर एक इसम गाडी पाहण्यासाठी आला व टेस्ट ड्राईव्ह घेण्याच्या बहाण्याने दुचाकी घेऊन फरार झाला.

याप्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. 152/2026, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी संबंधित OLX अकाउंटची माहिती घेतली. त्यास लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकाचे CDR प्राप्त करून तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तसेच विविध भागांतील CCTV फुटेज तपासण्यात आले. या तपासातून आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले.

त्यानुसार आरोपी मोहम्मद मुजबताब इकबाल शेख (वय 27, रा. खडी मशीन चौक, पिसोळी रोड, कोंढवा, पुणे) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून फिर्यादी यांची सुमारे 1 लाख रुपये किमतीची Royal Enfield Meteor 350, काळ्या रंगाची दुचाकी (वाहन क्रमांक MH 12 UZ 8018) हस्तगत करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार प्रशांत माटे हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ 04 पुणे शहर, श्री. सोमय मुंडे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर, श्रीमती नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके, पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार प्रशांत माटे, लालू कहे, अंकुश जोगदंडे, हरी पुंडे यांच्या पथकाने केली. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *