बारामतीत अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांवर अत्याचार; आरोपी मिलिंद जाधवला ४ वर्षांची सक्तमजुरी 

प्रतिनिधी -: भीमराव कांबळे 

बारामती : अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत महिलांवर लैंगिक अत्याचार व आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली आहे.

मिलिंद मदन जाधव (वय ५०, रा. धोपावे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) याने महिलांना “पैशाचा पाऊस पाडतो” असे खोटे आमिष दाखवून अघोरी पूजा आयोजित केली. या पूजेच्या नावाखाली महिलांना विवस्त्र अवस्थेत बसवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले तसेच आर्थिक फसवणूकही करण्यात आली.

या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 405/2024 नुसार बी.एन.एस. कलम 64, 69, 318(4) तसेच काळी जादू प्रतिबंधक कायदा 2013 अंतर्गत कलम 2(1)(B), 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात एकूण ७ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानदेव शिंगाडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. तसेच तपासी अधिकारी, कोर्ट कर्मचारी व पोलीस अधिकारी यांनी खटल्यात महत्त्वाचे सहकार्य केले.

बारामती येथील मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी निकाल देताना आरोपीस:बी.एन.एस. कलम 318(4) अंतर्गत २ वर्षे सश्रम कारावास व ५,००० रुपये दंड (दंड न भरल्यास १ महिना साधा कारावास)

काळी जादू प्रतिबंधक कायदा 2013 कलम 2(1)(B), 3 अंतर्गत ४ वर्षे सश्रम कारावास व १०,००० रुपये दंड (दंड न भरल्यास २ महिने साधा कारावास)
अशी शिक्षा सुनावली आहे.

या खटल्यात बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, कोर्ट कर्मचारी रेणुका पवार, तसेच पैरवी अधिकारी संतोष घोळवे, कसपटे (G PSI) व कवडे (ASI) यांनीही सहकार्य केले.

या निकालामुळे अंधश्रद्धा व भोंदूगिरीच्या नावाखाली होणाऱ्या गुन्ह्यांविरोधात समाजात कडक संदेश गेला असून अशा प्रकारांना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *