प्रतिनिधी -: नेहा पवार
प्रतिनिधी :देशभरात खळबळ उडवणाऱ्या साथानकुलम कोठडी मृत्यू प्रकरणात न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर निर्णय देत ९ पोलीस कर्मचाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल सहा वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आलेला हा निकाल देशातील कोठडीतील अत्याचारांविरोधातील एक मोठा टर्निंग पॉइंट मानला जात आहे.
जून २०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान साथानकुलम येथील व्यापारी पी. जयराज (५९) आणि त्यांचा मुलगा बेनिक्स (३१) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले होते. दुकान काही मिनिटे जास्त वेळ उघडे ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
ताब्यात असताना दोघांवर पोलीसांकडून अमानुष छळ करण्यात आला. लाठ्या-काठ्यांनी करण्यात आलेल्या बेदम मारहाणीमुळे ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान बेनिक्सचा २२ जून तर जयराज यांचा २३ जून २०२० रोजी मृत्यू झाला.
या प्रकरणात १ पोलीस निरीक्षक, २ उपनिरीक्षक आणि ६ कॉन्स्टेबल अशा एकूण ९ जणांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले.
न्यायालयाने हा गुन्हा “दुर्मिळातील दुर्मिळ” असल्याचे नमूद करत, “रक्षकच भक्षक बनले” अशी तीव्र टिप्पणी केली. त्यानंतर सर्व दोषींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवण्यात आला होता. CBI ने सादर केलेल्या ठोस आणि पुराव्यांवर आधारित युक्तिवादामुळे न्यायालयाने हा निर्णय दिला. अत्याचारांविरोधातील एक ऐतिहासिक निर्णय
पोलीस यंत्रणेला स्पष्ट इशारा
नागरिकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी मोठा न्यायिक संदेश.
हा निकाल केवळ जयराज आणि बेनिक्स यांच्या कुटुंबासाठी न्याय देणारा नाही, तर संपूर्ण देशासाठी एक ठोस संदेश देणारा आहे — कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यांनाही कठोर शिक्षा भोगावी लागेल.
