दौंड तालुक्यात महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल

 

वार्ताहर – गौरव जोगदंड

दौंड तालुक्यातील कुरकुंभ परिसरात एका ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात आरोपी अमोल काळे (रा. खडकी, ता. दौंड) याच्याविरुद्ध बलात्कार, धमकी व अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २५ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना मुकादमवाडी, कुरकुंभ (ता. दौंड) येथे घडली. फिर्यादी महिला आपल्या आईकडे जाण्यासाठी पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनाची वाट पाहत उभी होती. त्यावेळी एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या आरोपीने तिला पुण्याला सोडण्याचे आमिष दाखवून गाडीत बसवले.

गाडी पुढे नेत असताना आरोपीने महिलेशी अश्लील बोलणे सुरू केले. महिला विरोध करत गाडीतून उतरू लागल्यावर आरोपीने तिच्यावर बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर जबरदस्तीने गाडीतून खाली ओढून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच, घटनेदरम्यान महिलेला मारहाण करून जखमी केल्याची माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर आरोपीने पीडितेला धमकावून तेथून पळ काढला. मात्र, पीडित महिलेने धाडस दाखवत आरोपीच्या वाहनाचा क्रमांक (MH 42 BN 7755) लक्षात ठेवला व पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशन गु.र. नं. १८८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम ६४(१), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१)(w)(i)(ii), ३(२)(v) आणि आर्म अॅक्ट कलम ३, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी, दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *