लोकजागृती विशेष : पुणे जिल्ह्यातील मौजे हरगुडे (ता. पुरंदर) येथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी गंभीर घटना उघडकीस आली आहे. घर बांधण्यासाठी ठेवलेले लाखो रुपयांचे बांधकाम साहित्य चोरीला गेले, तरीही पोलिस प्रशासनाने अद्याप साधी तक्रारही नोंदवून घेतलेली नाही, असा संतापजनक आरोप समोर आला आहे.
पीडित दीपक महादेव शिळीमकर यांनी गट क्रमांक 499 मध्ये स्वतःचे घर बांधकाम सुरू केले होते. सिमेंट, वाळू, लोखंडी रॉडसह सर्व आवश्यक साहित्य त्यांनी जागेवर साठवून ठेवले होते. मात्र, काही अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या अंधारात हे साहित्य लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली.
याहूनही गंभीर बाब म्हणजे, या प्रकरणात संशयित म्हणून “मामांची मुले” असल्याचे स्पष्टपणे सांगूनही पोलिसांकडून कोणतीही तत्पर कारवाई झालेली नाही. उलट, तक्रार नोंदवून घेण्यासही टाळाटाळ केल्याचा आरोप पीडिताने केला आहे.
पीडिताचा थेट सवाल :
“माझे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलिस जर तक्रारच घेत नसतील, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुठे मागायचा?”
स्थानिकांमध्ये संताप
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “चोरी झाली तरी गुन्हा दाखल होत नसेल, तर गुन्हेगारांना मोकळे रान मिळणार नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

