तपासातील त्रुटी व पुराव्यांच्या अभावामुळे रोहित बनकर निर्दोष; बारामती न्यायालयाचा निकाल

बारामती -: बारामती येथील मे. पुजारीसो कोर्ट यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालात IPC कलम 354, 354(A), 354(B), 325, 294, 323, 504 व 506 अंतर्गत दाखल फौजदारी प्रकरणात आरोपी श्री. रोहित आत्माराम बनकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे फिर्यादीकडून आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते. मात्र न्यायालयीन सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेकडून झालेल्या त्रुटी, साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती, तसेच अभियोजन पक्षाकडून आरोप शंकातीत सिद्ध करण्यात आले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट नमूद केले की, फौजदारी प्रकरणात संशयावर दोषारोप होऊ शकत नाही आणि आरोपीविरुद्ध ठोस, विश्वासार्ह व सुसंगत पुरावे सादर होणे आवश्यक असते. सदर प्रकरणात ते अपयशी ठरल्याने आरोपीस संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त करण्याचा आदेश देण्यात आला.

आरोपींच्या वतीने ॲड. मेघराज राजेंद्र नालंदे व ॲड. ओंकार विजय इंगुले यांनी प्रभावी व सुस्पष्ट युक्तिवाद सादर केला. त्यांनी तपासातील कायदेशीर त्रुटी, पुराव्यांचा अभाव, तसेच तथ्यात्मक विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस निर्दोष मुक्त केले.

या निकालामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, खोट्या अथवा अतिशयोक्त आरोपांच्या बाबतीत कायद्याच्या कसोटीवर पुरावे किती महत्त्वाचे असतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, अशी प्रतिक्रिया बचाव पक्षाकडून व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *