स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची गैरसोय की तांत्रिक प्रक्रिया? चौकशीची नागरिकांची मागणी.

फलटण (जि. सातारा): फलटण शहर व तालुक्यात बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत अनेक ग्राहकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, महिन्याच्या नियोजित मुदतीपूर्वीच वीजबिल तयार होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नेमके बिल कोणत्या कालावधीचे आहे, मीटर रीडिंग कधी घेतले जाते आणि बिल मुदतीपूर्वी कसे तयार होते, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
काही ग्राहकांचा दावा आहे की, पूर्वी महिनाभराच्या वापरानंतर येणारे वीजबिल आता मुदतीपूर्वीच उपलब्ध होत आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये काही तांत्रिक अडचण आहे का, की ही नियमित बिलिंग प्रक्रिया आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरच्या बिलिंग प्रक्रियेबाबत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (MSEDCL) आणि संबंधित कंत्राटदार यांनी स्पष्ट खुलासा करावा, तसेच आवश्यक असल्यास स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडावी, अशी मागणी काहीनागरिकांकडून केली जात आहे.
याबाबत अधिकृत प्रशासन किंवा वीज वितरण कंपनीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन वस्तुस्थिती स्पष्ट होणार का, असा प्रश्न फलटणकरांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
