पुणे गुन्हे शाखा युनिट-7 ची मोठी कारवाई – हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

पुणे : शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करताना पुणे गुन्हे शाखेच्या युनिट-7 ने मोठी यशस्वी कारवाई करत हातभट्टी दारू निर्मितीचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे.

दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी गुन्हे शाखा युनिट-7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही छापेमारी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, भावडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील हंडगर वस्ती परिसरात अवैधरीत्या हातभट्टी दारू तयार केली जात होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असता घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य जप्त करण्यात आले.

या कारवाईत सुमारे 5,600 लिटर कच्चे रसायन तसेच इतर साहित्य असा एकूण अंदाजे ₹2,00,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच संबंधित अड्डा जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आला.

या प्रकरणी संबंधित आरोपीचा शोध सुरू असून, वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 251/2026 नोंद करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कलम 65 (फ)(ब)(क) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (गुन्हे) विवेक मासाळ व सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत पोलीस कर्मचारी ऋषिकेश ताकवणे, निर्णय लांडे, विनायक साळवे, गिरीश नाणेकर, सुहास तांबरेकर, भरत गुंडवाड तसेच महिला पोलीस कर्मचारी नेहा तापकीर, सोनाली नरवडे आणि प्रतीक्षा पानसरे यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *