फलटण (प्रतिनिधी) – फलटण तालुक्यातील ढवळ मिरेवाडी परिसरात एका तरुण युवकाच्या निर्घृण खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मध्यरात्री 1 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणावर प्रेमप्रकरणातून वैर निर्माण झाल्याने तब्बल 10 ते 15 जणांच्या टोळक्याने मिळून हल्ला करत त्याची अत्यंत निर्दयीपणे हत्या केली. हल्लेखोरांनी युवकावर क्रूर पद्धतीने वार करत त्याचा जीव घेतल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा व तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर सर्व आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
दरम्यान, या भीषण घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याची आणि आरोपींना तात्काळ अटक करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
