
फलटण -: राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवणारे ११४७ एकर शेतीजमीन व्यवहार प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून, त्यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खाऊन, पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेतीजमीन खरेदी-विक्री करून ती हडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकूण ११४७ एकर जमिनीचा व्यवहार संशयास्पद पद्धतीने झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील माहिती काही पत्रकारांच्या व्हिडिओमधून पुढे आल्यामुळे हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.
या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे विदर्भ प्रदेशाध्यक्ष महेंद्र मुनेश्वर यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत, बावनकुळे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
तसेच, संबंधित ११४७ एकर जमीन नेमकी कशी मिळवली, याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि आवश्यक असल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाने तातडीने द्यावेत, असेही मुनेश्वर यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनीही या प्रकरणात सरकारला कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. येत्या काळात या प्रकरणावर सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
